पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील मुस्लीम महिलांनी अनोख्या पद्धतीने साजरा केल्याचे समोर आले आहे. वाढदिवसानिमित्त मुस्लिम महिला फाउंडेशनच्या महिलांनी “मोदी, मुस्लिम मुलींचे पालक” या कार्यक्रमांतर्गत नरेंद्र मोदींच्या छायाचित्राची आरती करून, नरेंद्र मोदींचे आभार मानले. मुस्लिम महिलांनी मोदींच्या नावाची व भाजपाचे चिन्ह असलेल्या कमळाची रांगोळी देखील यावेळी काढली होती.

लमही स्थित इंद्रेश नगरच्या सुभाष भवनात मुस्लीम महिला फाउंडेशनच्या महिलांनी रांगोळी काढून, मोदींच्या छायाचित्राची ७१ दिवे पेटवून आरती केली. याचबरोबर, मोदींच्या छायाचित्रास प्रतिकात्मकरित्या लाडू भरवला. त्यानंतर सुभाष भवनात लाडुंचे वितरण करण्यात आले.

मुस्लीम महिला फाउंडेशनच्या नाजनीन अन्सारी यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी मुस्लीम मुलींसाठी पालक आहेत. जे त्यांचा घर वसावण्यासाठी काळजी करतात, ते तुटू देत नाही. मोदींसारखे कुणी झाले नाही व होणार नाही. मुस्लीम महिलांसाठी मोदी उद्धारक आहेत.

जगभरातील अन्य काही देशांप्रमाणे भारतामधील मुस्लीम महिलांचे जीवन देखील काही काळ अगोदर अत्यंत कठीण होते. तीन तलाकच्या बंधनात जखडलेल्या आणि हलाला सारख्या प्रथेमुळे त्यांना अनेकप्रकारचा त्रास सहन करावा लागत होता. पतीकडून घरातून हाकलून दिल्या जाण्याच्या भीतीपोटी या महिला पतीकडून होणारे अत्याचार सहन करत होत्या, निकाहानंतर त्यांना कोणताच कायदेशीर अधिकार उरत नव्हता, ज्यामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळू शकेल. म्हणून वर्ष २०१३ मध्ये वाराणसीमधून मुस्ली महिलांनी मुस्लीम फाउंडेशनच्या नेतृत्वात तीन तलाक विरोधात आंदोलन सुरू केले आणि नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पाठिंबा मागितला. यानंतर मोदींनी मुस्लीम महिलांच्या या मागणीला कायदेशीर पाठबळ देण्यासाठी मोठा निर्णय घेतला व तीन तलाक विरोधात कायदा बनला. मुस्लीम महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला.

अत्याचारांपासून मुस्लीम महिलांची सुटका झाली आणि धर्माच्या नावाखाली त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अत्याचारांना आळा बसला. मोदींच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिलांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केलेले आहेत.