पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या इच्छेचा स्विकार करीत त्यांना पुढील दोन आठवड्यांसाठी पदभार सांभाळण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी पी. के. सिन्हा यांची पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

सरकारचे मुख्य प्रवक्ते सीतांशू कार यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी मिश्रा यांना पुढील दोन आठवड्यांसाठी पदावर कायम राहण्यास सांगितले आहे. तर माजी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांना पंतप्रधानांनी विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.तर मिश्रा यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करायला मिळणे हे माझे भाग्य होते. या संधीसाठी मी त्यांचे आभार मानतो. आता मला पुढे जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्रा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पाच ट्विट केले आहेत.


युपी केडरचे आयएएस अधिकारी असलेले नृपेंद्र मिश्रा यांनी यापूर्वी मुलायमसिंह यादव आणि कल्याणसिंह यांच्या सरकारमध्ये मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. त्यांची एक तडफदार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले आहे. त्यांच्या याच गुणांमुळे त्यांना केंद्रात काम करण्याची संधी मिळाली.

नृपेंद्र मिश्रा यांना २०१४ मध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती देण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी दूरसंचार विभागत सचिवपदी, खते विभागात सचिवपदी काम केले आहे. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये २००६ ते २००९ या काळात टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) चेअरमनपदाची धुरा सांभाळली होती.