अमेरिकेत अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरु असून राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार केला गेला आहे. अमेरिकेच्या संसदेत तोडफोड करण्यात आली आहे. जगभरात या घटनेचे पडसाद उमटले असून यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर भाष्य केलं असून हिंसाचाराच्या बातम्या ऐकून आपण असस्थ झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी यावर ट्विट केलं यात ते म्हणाले, “वॉशिंग्टन डी. सी. मधील दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो आहे. व्यवस्थित आणि शांततेत सत्ता हस्तांतरण सुरूच राहिले पाहिजे. बेकायदा निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागू दिला जाऊ शकत नाही”

आणखी वाचा- अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष, ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; संसदेत घुसून तोडफोड

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला आहे. ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील अमेरिकन काँग्रेसच्या (संसद) कॅपिटॉल इमारतीत घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा- फेसबुक आणि ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई

जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थक कर्फ्यूचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात इमारतीबाहेर गर्दी केली. दरम्यान, बैठक सुरु असतानाच आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास झटापट सुरु होती. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. पोलीस सध्या ट्रम्प समर्थकांना हटवण्याचं काम करत आहेत.