X

‘या’ ठिकाणी तयार होतंय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर

इतरही काही नेत्यांची मंदिरे उभारण्यात आली आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशासह परदेशात अनेक चाहते आहेत. त्यांची बोलण्याची स्टाईल, कपड्यांची नेहमीच चर्चा होत असते. त्यांचा ठराविक असा चाहता वर्ग आहे, या चाहत्यांना मोदींविरोधात कोणी अपशब्द काढल्याचेही आवडत नाही. त्यांना मोदी भक्त असेही काही जण संबोधतात. मात्र, ही बाब आता शब्दशः खरी ठरणार आहे. कारण मोदींना देवाप्रमाणे मानणाऱ्या एक व्यक्तीने त्यांचे मंदीर बनवण्याची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले जाणार आहे. यासाठी ५ एकर जमीनही संपादित करण्यात आली आहे. येथे मोदींची १०० फूटी मुर्ती उभारली जाणार आहे. एका निवृत्त अभियंत्याने मोदींचे हे मंदिर उभारण्याची घोषणा केली आहे. त्यांने म्हटले आहे की, मोदींची लोकप्रियता पाहता त्यांनी हे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, मोदी हे असे एकमेव राजकीय व्यक्ती नाहीत ज्यांचे मंदिर उभारण्यात येत आहे. देशात असे आणकी राजकीय पुढारी आहेत ज्यांची मंदिरे उभारली गेली आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा समावेश आहे. तेलंगण राज्यातील मल्लिअल येथे सोनिया गांधींचे मंदिर उभारण्यात आले आहे. यामध्ये त्यांची पितळी मुर्ती स्थापित करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यात त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य जसे राजीव गांधी, राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमाही लावण्यात आल्या आहेत.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांचे देखील मंदिर त्यांच्या चाहत्यांनी उभारले आहे. सन २०११ मध्ये तामिळनाडूतील तिरुनिनरावूर जिल्ह्यात हे मंदिर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी एमजीआर यांच्या दर्शनासाठी त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर येत असतात.

नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील राजकोट येथे यापूर्वीच एक मंदिर बनवण्यात आले आहे. या मंदिरात मोदींची मुर्ती स्थापित करण्यात आली असून या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम ट्रस्टद्वारे चालते.

First Published on: October 5, 2017 8:40 pm
Outbrain