इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान  हे चीन दौऱ्यावर जात असून त्यात ते चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेअंतर्गत (सीपीईसी) आणखी मोठे प्रकल्प पाकिस्तानात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जलविद्युत, तेल शुद्धीकरण व पोलाद कारखाने यात चीनने गुंतवणूक करावी यासाठी ते चर्चा करणार आहेत.

चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प हा ६० अब्ज डॉलर्सचा आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे मंगळवारी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी बीजिंगमध्ये आगमन होईल त्यावेळी ते चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते प्रादेशिक व द्विपक्षीय महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. चीनच्या नेत्यांशी ते सीपीईसी मार्गिकेतील प्रकल्पांबाबत बोलणी करणार आहेत. अनेक कारणांमुळे जे प्रकल्प बंद पडले आहेत तेही पुन्हा सुरू करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आर्थिक अडचणी, नोकरशाहीचे अडथळे, राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाचे नियम यामुळे हे प्रकल्प बंद पडले आहेत.

पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांची ही तिसरी चीन भेट असून गेल्या ऑगस्टमध्ये ते पंतप्रधान झाले होते. अध्यक्ष क्षी जिनपिंग हे पुढील आठवडय़ात पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच्या अनौपचारिक बैठकीसाठी चेन्नईला येत आहेत. त्याआधी इम्रान यांची जिनपिंग यांच्याशी ही महत्वाची चर्चा होत आहे. जलविद्युत, तेल शुद्धीकरण, पोलाद कारखाने यात चीनची मदत घेण्यासाठी ते चर्चा करणार आहेत असे नियोजन व विकास मंत्री मखदुम खुस्रो बख्तयार यांनी सांगितले. एलएनजी टर्मिनल, सात हजार मेगावॉटचा बुंजी जलविद्युत प्रकल्प, पाकिस्तान पोलाद कारखाना, तेल शुद्धीकरण कारखाना यात चीनची मदत घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा अपेक्षित असून उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त प्रकल्पांचाही विचार होणार आहे.

इम्रान खान प्रवास करीत असलेले विमान माघारी नेण्याचे सौदीचे आदेश

इस्लामाबाद : संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीर मुद्दा उपस्थित करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणावर सौदी अरेबियाने आपली नाराजी कशी व्यक्त केली त्याबाबतचा गौप्यस्फोट पाकिस्तानातीलच एका साप्ताहिकाने केला आहे.

संयुक्त राष्ट्रांचा दौरा आटोपून इम्रान खान न्यू यॉर्क येथून पाकिस्तानला परतत असताना त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला, त्यामुळे ते कॅनडाहून पुन्हा न्यू यॉर्कला नेण्यात आले, असे वृत्त आले होते. मात्र त्यामध्ये तथ्य नसून इम्रान यांच्या दिमतीसाठी धाडण्यात आलेले हे विमान सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनीच माघारी नेण्याचे आदेश दिले होते. इम्रान यांच्या भाषणावर सलमान नाराज होते, त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले. त्यानंतर इम्रान यांना अन्य विमानाने प्रवास करावा लागला होता, असेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.