काँग्रेसचा पराभव मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे झाला व यूपीए सरकारच्या अपयशामुळेच निवडणुकीत पक्ष यूपीए आघाडी तोंडघशी पडली, असा आरोप लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार रवि नाईक यांनी  येथे केला. काँग्रेसचे रवि नाईक यांचा भाजपचे श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा मतदारसंघात पराभव केला होता.
वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, की पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना यूपीए सरकारची कामगिरी गेल्या १० वर्षांत लोकांसमोर मांडता आली नाही, त्यामुळे यूपीए आघाडीचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. गोव्यातील लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजपला मिळाल्या आहेत.
दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री असलेल्या रवि नाईक यांनी सांगितले, की यूपीए सरकारची कामगिरी मनमोहन सिंग यांनी लोकांपर्यंत पोहोचवायला हवी होती, .
मंदीच्या काळात यूपीए सरकारने देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवली होती, त्या वेळी अनेक योजना व कायदे तयार करण्यात आले. माहितीचा अधिकार हा कायदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने तयार केला. पंतप्रधानांनी लोकांना ते समजून सांगायला पाहिजे होते असे माजी खासदारांनी सांगितले.
आताचे निकाल म्हणजे गोव्यात काँग्रेस संपली असे नाही. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत लोक पुन्हा काँग्रेसला मते देतील. गेल्या दोन वर्षांत र्पीकर सरकारची कामगिरी नकारात्मक असून नेमकी हीच गोष्ट काँग्रेसच्या पथ्यावर पडेल असा दावा त्यांनी केला.