राजस्थानमध्ये सुरु असलेला तमाशा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंद करावा असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. विधानसभेचं अधिवेशन घेण्यासंबंधीची घोषणा झाल्यानंतर घोडेबाजाराला उत आला आहे. सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या खरेदी विक्रीचा खेळ सुरु आहे. या सगळ्या मागे भाजपाच आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीनींच हा सगळा तमाशा आणि घोडेबाजार बंद करावा असं म्हणत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाकडून सुरु असलेला हा घोडेबाजार अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. कर्नाटक आणि मध्यप्रदेशात राबवलेला प्रयोगच इथे केला जातो आहे असाही आरोप गेहलोत यांनी केला.

वसुंधरा राजे या राजस्थानमधल्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याशी टक्कर घेण्याच्या नादात राजेंद्र राठोड आणि सतीश पुनिया यांनी सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं आहे. वसुंधरा राजे यांचं महत्त्व कमी करण्यासाठी सगळं केलं जातं आहे. वसुंधरा राजे या कुठे आहेत ते ठाऊक नाही. गुलाबचंद कटारिया हे मीडियासमोर आम्हाला शिव्या देतात त्यावरुन त्यांची विचारसरणी काय आहे ते कळतं असंही गेहलोत यांनी म्हटलं आहे.

राजस्थानात सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारविरोधात बंडाचा झेंडा उगारला आहे. त्यामुळे राजस्थानात राजकीय भूकंप झाला. आता हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं आहे. या सगळ्यात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या राजकीय भूकंपाला भाजपा जबाबदार असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. आज तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजस्थानमधला हा तमाशा बंद करावा असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.