ब्रिटीश राजघराण्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते सेल्फ आयसोलेशनमधून बाहेर आले आहेत. राजघराण्याच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. मागच्या आठवडयात त्यांचा करोना व्हायरस चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

नॅशनल हेल्थ सर्व्हीसने केलेल्या चाचणीमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. स्कॉटलंडच्या क्वीन्स बालमोराल इस्टेट येथे ते आयसोलेशनमध्ये राहत होते. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आयसोलेशनमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. ७१ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांच्यामध्ये करोना व्हायरसची सौम्य लक्षणे आढळली होती.

प्रिन्स यांची प्रकृती उत्तम असून ते सरकारी निर्बंधांचे पालन करत आहेत. ते घरातूनच काम करणार आहेत असे क्लेअरन्स हाऊस रॉयल ऑफिसकडून सांगण्यात आले. प्रिन्स चार्ल्स यांना कशामुळे करोना व्हायरसची लागण झाली ते स्पष्ट होऊ शकले नाही. संपूर्ण ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचे मोठया प्रमाणावर रुग्ण आहेत. मागच्या आठडयात प्रिन्स यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ७० हजाराहून अधिक ट्विट पडले. अनेक नेटकऱ्यांनी प्रिन्स चार्ल्स यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना केली होती.