ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल आज (शनिवार) विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये आज अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. मोठ्या थाटामाटात पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्याचा खर्च नेमका किती आहे आणि तो खर्च कोण उचलणार हे तुम्हाला माहित आहे का?

शाही विवाहसोहळा म्हटलं की व्हीआयपी पाहुण्यांची सोय, सुरक्षा, पाहुणाचार आणि इतर गोष्टींचा खर्च हा कोट्यवधींच्या घरात जातो. या सोहळ्यावर सुमारे २९३ कोटी रुपये खर्च होणार असल्याचं समजतंय.

सुरक्षेचा खर्च
प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या विवाहाचं आमंत्रण जवळपास ६०० पाहुण्यांना दिलं गेलं आहे. तसंच, संध्याकाळच्या स्वागत समारंभाला २०० पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. राजघराण्यातील व्यक्तीचा विवाह असल्यानं सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. यासाठी लागणाऱ्या सुरक्षेचा खर्च देखील मोठा असणार आहे. त्यावर सुमारे २७० कोटींहून अधिक खर्च होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पाहुणाचार
विवाहसोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांसाठी अल्पोपहार आणि विविध मिष्टान्नांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय लेमन केक, शॅम्पेन व व्हिस्कीचीही व्यवस्था आहे. सुमारे ६०० पाहुणे स्नेहभोजन करणार असून २६४० पाहुण्यांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. यात केकचा खर्च ५० हजार ब्रिटीश पाऊंड, फुलांचा खर्च ११० हजार ब्रिटीश पाऊंड तर केटरर्सचा खर्च २८६ हजार ब्रिटीश पाऊंड असा गृहित धरण्यात आला आहे.

स्वागत समारंभाचा खर्च
विंडसर कासलमधल्या सेंट जॉर्ज चॅपलमध्ये हा विवाहसोहळा होणार असून रिसेप्शन मात्र वेगळ्या ठिकाणी होणार आहे. रिसेप्शनसाठी खास काचेचा शामियाना तयार करण्यात आला असून त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

ही अधिकृत आकडेवारी नसल्यानं सध्या फक्त अंदाजच व्यक्त करता येऊ शकतो.

या शाही विवाहसोहळ्याचा खर्च कोण करणार?
विवाह सोहळ्याच्या सुरक्षेचा खर्च हा करदात्या नागरिकांच्या पैशातूनच केला जाईल. थेम्स व्हॅली पोलिसांना सुरुवातीला हा खर्च करावा लागेल. त्यानंतर, या खर्चासाठी थेम्स व्हॅली पोलीस गृह विभागाकडे खर्चाची मागणी करू शकतील. विशेष अनुदानाच्या रूपात हे पैसे मागितले जातील. सुरक्षेच्या खर्चाव्यतिरिक्त इतर खर्च राजघराण्याकडून करण्यात येईल.