बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर कॉप्या करण्याच्या घटनाही समोर येत आहे. काही ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करत असल्याचे व्हिडीओ महाराष्ट्रातही समोर आला. यावरही कळस म्हणजे एका मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांना शंभर रूपये द्या आणि कॉप्या करा, असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे कॉपी करताना पकडले गेले, तर काय करायचं याच्याही टिप्स मुख्याध्यापकानं दिल्या.

उत्तर प्रदेश माध्यमिक मंडळाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या एका मुख्याध्यापकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लखनौमधे असलेल्या खासगी शाळेचे उपप्राचार्य प्रवीण मल यांचा व्हिडीओ एका विद्यार्थ्याने काढला. व्हिडीओमध्ये प्राचार्य काही पालकांसमोर विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत कॉपी कशी करावी हे सांगत आहेत. एका विद्यार्थ्याने हा व्हिडीओ उत्तर प्रदेश सरकारच्या तक्रार दाखल करण्याच्या पोर्टलवर अपलोड केला. त्यानंतर प्राचार्याला अटक करण्यात आली.

आणखी वाचा – …तर पुलवामासारखा हल्ला करेल, दहावीच्या विद्यार्थानं दिली धमकी

प्राचार्य विद्यार्थ्यांना काय म्हणाले?

दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये प्राचार्याचा विद्यार्थ्यांशी केलेला संवाद आहे. “मी निश्चितपणे सांगतो की, माझा कोणताही विद्यार्थी नापास होवू शकत नाही. परीक्षेदम्यान तुम्ही एकमेकांशी बोलू शकता आणि पेपर लिहू शकता. कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. तुम्ही घाबरू नका. तुम्ही ज्या शाळांमध्ये सरकारी शाळांमध्ये परीक्षा देणार आहात तेथील शिक्षक माझे मित्र आहेत. जर तुम्ही पकडला गेलात आणि कुणी तुम्हाला मारलं तर घाबरून जावू नका. कोणताही प्रश्न सोडू नका. आपल्या उत्तरपत्रिकेत १०० रुपयांची नोट ठेवून द्या. शिक्षक तुम्हाला डोळे बंद करून मार्क देतील. जर तुम्ही चार मार्काच्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले, तर तुम्हाला तीन मार्क तरी मिळतील,” असं या प्राचार्यानं विद्यार्थ्यांना सांगितलं.