देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसल्याचं दिसत आहे. रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना मृतांचा आकडा देखील नियंत्रणात आणण्यात अद्याप अपयश आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी बुधवारी देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे चिंता अधिकच वाढली होती. या पार्श्वभूमीवर राघवन यांनी करोनाची तिसरी लाट आपण कशी रोखू शकतो, याविषयी मार्गदर्शन करणारी भूमिका मांडली आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत के. विजय राघवन यांनी ही भूमिका मांडल्यामुळे केंद्र सरकार आणि देशभरातील राज्य सरकारांसाठी ही महत्त्वाची बाब ठरली आहे.

 

काय म्हणाले राघवन?

के. राघवन यांनी देशातील सर्व आरोग्य यंत्रणांसोबतच प्रशासकीय व्यवस्थापनाला देखील यावेळी सूचनावजा इशाराच दिला आहे. “जर आपण कठोर पावलं उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर करोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे अवलंबून असेल”, असं ते म्हणाले. त्यामुळे करोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असल्याचं सांगतानाच या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणं देखील आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

तिसऱ्या लाटेविषयी राघवन यांनी दिला होता इशारा!

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं होतं. “भारतात करोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि करोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं”, असं ते म्हणाले होते.

भारतातील करोना रुग्णांची आकडेवारी चिंताजनक!

देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे. दरम्यान ३९१५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचं लसीकरण झालं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं केली सरकारची कानउघाडणी!

दरम्यान, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून न्यायालयानं केंद्र सरकारची आणि दिल्ली सरकारची कानउघाडणी केली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिल्ली सरकार आणि केंद्राची कानउघाडणी केली. “प्राणवायूअभावी दिल्लीत अनेकांना प्राण गमावावे लागत आहेत. त्यामुळे प्राणवायू वितरण आणि पुरवठ्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता सहकार्याने काम करावे. करोनाची तिसरी लाट येणार असून, ती मुलांसाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आमच्या वाचनात आले आहे. आताच पूर्वतयारी केली तर या करोना लाटेस सामोरे जाता येईल. त्यासाठी प्राणवायूचा संरक्षित साठा असला पाहिजे. केवळ प्राणवायू वाटप करून जमणार नाही, तर त्याचा रुग्णालयांना अखंडित पुरवठा करण्याची व्यवस्था करायला हवी’’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.