भारताने सोमवारी सकाळी संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ३५० किलोमीटरवरील लक्ष्य अचूकपणे भेदण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. संरक्षण दलातील सूत्रांनी ही माहिती दिली.
जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची चंडिपूर येथील चाचणी तळावरून सोमवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास चाचणी घेण्यात आली. संरक्षण दलाच्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड विभागाने नैमित्तिक सरावाचा भाग म्हणून या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण झाल्यानंतर चाचणी यशस्वी झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले असून, ते याआधीच संरक्षण दलामध्ये दाखल झाले आहे. पाकिस्तानमधील महत्त्वाची शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आहेत.