भाजप खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी शुक्रवारी खासगी शिकवण्या म्हणजे शैक्षणिक दहशतवाद असल्याचे सांगत खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्याची मागणी केली. लोकसभेतील शुन्य प्रहरात परेश रावल यांनी हा मुद्दा उपस्थित करताना शैक्षणिक क्षेत्रातील खासगी शिकवण्यांच्या भूमिकेवर मिष्किलपणे टिप्पणी केली. सध्याच्या काळात खासगी शिकवण्यांचे क्षेत्र हे संघटित झाले आहे. या संस्थांची सरकारी शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षकांशी अभद्र युती असून स्पर्धात्मक परीक्षांवरदेखील या संस्था प्रभाव पाडत असल्याचे परेश रावल यांनी म्हटले. मात्र, हल्ली पालकांना त्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवायचे नसते. त्याऐवजी पालक मुलांना खासगी क्लासेसमध्ये पाठवतात. सरकारी शाळांमधील शिक्षकच या क्लासेसमध्ये शिकवतात. खासगी शिकवण्यांचे हे वाढते प्रस्थ शैक्षणिक दहशतवादासारखे आहे. दहशतवाद्यांप्रमाणेच सरकारकडे या खासगी शिकवण्यांची कोणतीही माहिती नाही. कोणतेही नियंत्रण किंवा परवान्याशिवाय या शिकवण्या सुरू असल्याचे परेश रावल यांनी सांगितले.