खासगी सरकारी भागीदारी प्रकल्पातील गुंतवणुकीत उत्तर प्रदेश आघाडीवर असून त्या खालोखाल महाराष्ट्र व गुजरात यांचे क्रमांक आहेत, असे अ‍ॅसोचेम व एसआरइआय यांच्या अलिकडील पाहणी अहवालात म्हटले आहे. पीपीपी इन्व्हेस्टमेंट इन इंडियन स्ट्रक्चर-नीड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या अहवालात म्हटल्यानुसार उत्तर प्रदेश खासगी सरकारी गुंतवणुकीच्या प्रकल्पात आघाडीवर असून त्यांचा वाटा २२ टक्के आहे. महाराष्ट्र (११ टक्के), हरयाणा (८.५ टक्के), गुजरात (६ टक्के), मध्य प्रदेश (४.५ टक्के) याप्रमाणे इतर राज्यांची क्रमवारी आहे. गुजरातचा पायाभूत प्रकल्पात १५.५ टक्के इतका खासगी-सरकारी गुंतवणूक वाटा असून उत्तर प्रदेश व महाराष्ट्र (प्रत्येकी १३ टक्के) अशी स्थिती आहे. एकूण १२०० प्रकल्पात भारतामध्ये ७ लाख कोटींची गुंतवणूक होत आहे असे अ‍ॅसोचेमचे सरचिटणीस डी.एस रावत यांनी सांगितले. खासगी-सरकारी भागीदारीत प्रकल्प बंद पडण्याचे प्रमाण महाराष्ट्रात १३ टक्के असून छत्तीसगड (१० टक्के), गुजरात (९ टक्के) केरळ (७ टक्के) मध्य प्रदेश (७ टक्के) असे इतर राज्यातील प्रमाण आहे.