भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या सह पक्षातील इतर ज्येष्ठ सदस्यांना घेऊन निघालेल्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान आपत्कालिन स्थितीत दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले. विमानामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली हेदेखील होते. आपत्कालिन स्थिती विमान उतरविल्यानंतर त्यातील सर्वजण सुखरूप असल्याचे  सूत्रांनी सांगितले.
नुकत्याच  जाहीर झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेथील एका जाहीरसभेसाठी हे सर्व नेते बंगळुरूला निघाले होते. त्यांच्या विमानाने उड्डाण केल्यावर नऊ मिनिटांनी त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान पुन्हा उतरविण्याची मागणी केली. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने त्यांना विमान उतरविण्याची परवानगी दिली. त्यानंतर आपत्कालिन स्थितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्यानंतर हे विमान खाली उतरविण्यात आले.
हे विमान मुंबईतील ईऑन एव्हिएशनचे असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या सर्व नेत्यांना बंगळुरुला नेण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.
आपत्कालिन स्थिती हे विमान उतरविण्याचा वैमानिकाचा निर्णय योग्यच असल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने म्हटले आहे.