दिल्लीत खासगी कार्यालयं उघडण्यास केजरीवाल सरकारने संमती दिली आहे. मात्र जास्तीत जास्त कर्मचारी घरुन काम करतील असं पाहा. असंही केजरीवाल यांनी सांगितलं. तसेच बाजारपेठाही उघडण्यास संमती दिली आहे. मात्र दुकानं उघडण्यासाठी ऑड-इव्हन तारखांचा फॉर्म्युला नक्की करण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली घोषणा केली.

ऑटो रिक्षा, ई रिक्षा, सायकल रिक्षा यांनाही दिल्लीत संमती देण्यात आली आहे. मात्र चार चाकी वाहनांना संमती देण्यात आलेली नाही. रिक्षांमध्ये एकावेळी एकच प्रवासी बसेल अशी खबरदारी चालकाने घ्यायची आहे असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. दिल्लीच्या रस्त्यावर बसेसही धावताना दिसणार आहेत. मात्र एकावेळी फक्त २० प्रवाशांना बसमधून प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळले जात आहेत ना याची काळजी दिल्ली वाहतूक विभागाने घ्यायची आहे असंही त्यांनी सांगितलं.