केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाची कोणतीही मुदत निश्चित केलेली नाही, तथापि गुंतवणूकदारांकडून दिसलेले निर्णायक स्वरूपाचे स्वारस्य पाहता, या मुद्दय़ाबाबत काही आठवडय़ांतच अंतिम तोडगा येऊ शकेल, असा विश्वास नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला.

या हवाई सेवेवर दिवसाला २६ कोटी रुपयांचा तोटा सरकारला सोसावा लागत असल्याने, एअर इंडियाचे लवकरात लवकर खासगीकरण न झाल्यास, या कंपनीला बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे हरदीप सिंग पुरी यांनी नोव्हेंबरमध्ये लोकसभेत विधान केले होते. तथापि, मंगळवारी मात्र त्यांचा सूर सकारात्मक दिसून आला.

एअर इंडियाचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दमदार सेवा जाळे आहे, कंपनीची नाममुद्राही प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे या हवाई सेवेचे बस्तान गुंडाळण्यापेक्षा, चांगले गुंतवणूकदार शोधून तिचे खासगीकरण करण्याबाबत सरकारचे गंभीरतेने प्रयत्न सुरू आहेत.