देशात एकीकडे करोनाची रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असताना दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. व्यापक प्रमाणात लसीकरण केल्यास तिसरी लाट थोपवता येईल असं मत तज्ज्ञ मांडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटासाठी देखील मोफत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र, दुसरीकडे लसीकरणाचे आकडे रोज मोठ्या प्रमाणावर बदलत असल्यामुळे लसीकरणाच्या कामगिरीमध्ये सातत्य असल्याचं दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी विक्रमी लसीकरण केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेत असतानाच दुसऱ्याच दिवशी देशातल्या लसीकरणाचा आकडा तब्बल ४० टक्क्यांनी घटला”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

२१ जूनपासून सर्वांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी भारतात विक्रमी ८८ लाख नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे याच वेगाने गेल्यास डिसेंबरपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला लसीकरण पूर्ण झालं असेल, असे आडाखे बांधले गेले. मात्र, दुसऱ्याच जिदिवशी हा आकडा जवळपास निम्म्याने खाली आला. मंगळवारी फक्त ५३ लाख नागरिकांना लसीकरण होऊ शकलं. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याचा सरकारचा पीआर इव्हेंटच होता का? असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पंतप्रधान इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसतायत!

प्रियांका गांधी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “डेल्टा प्लस व्हेरिएंट देशात दाखल झाला आहे. आत्तापर्यंत फक्त ३.६ टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. पण पंतप्रधान मात्र इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसत आहेत. स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये ४० टक्क्यांची घट आली आहे”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवरून केलेल्या ट्वीटमधून त्यांनी ही टीका केली आहे.

 

विक्रमी लसीकरणाचा फॉर्म्युला…

आपल्या ट्वीटमध्ये प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारच्या विक्रमी लसीकरणाचा फॉर्म्युला असं म्हणत मध्य प्रदेशमधली आकडेवारी दिली आहे.

“विक्रमी लसीकरणाचा फॉर्म्युला.. मध्य प्रदेश

२० जून – ६९२ नागरिकांना लसीकरण
२१ जून – १६ लाख ९१ हजार ९६७ जणांना लसीकरण
२२ जून – ४ हजार ८२५ नागरिकांना लसीकरण

लसी जमा केल्या, इव्हेंटसाठी एका दिवसात लसी दिल्या आणि पुन्हा पुढच्या दिवशी लसीकरण कमी झालं. डिसेंबरपर्यंत सगळ्यांना लस देण्यासाठी देशात दररोज ८० ते ९० लाख लोकांना लसीकरण करायला हवं”, असं प्रियांका गांधी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

vaccination in india : लसीकरणाचा वेग मंदावला

राहुल गांधींचाही निशाणा!

दरम्यान, प्रियांका गांधी यांच्यासोबतच त्यांचे बंधू आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवरून केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर निशाणा साधला आहे.

 

“करोनाचं लसीकरण जोपर्यंत सातत्याने व्यापक प्रमाणावर होत नाही, तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाहीये. दुर्दैवाने केंद्र सरकार पीआर इव्हेंटच्या पुढे जाऊ शकत नाहीये”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.