दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं म्हटलं आहे. मात्र आता मोदींच्या या दाव्यावरुन भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झालीय. याचसंदर्भात शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही मोदींच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जर संपूर्ण भारत बांगलादेशची निर्मिती व्हावी या बाजूने होता तर आंदोलनाची गरज काय होती?, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय.

मोदी नक्की काय म्हणाले?

सावर येथील भाषणामध्ये मोदींनी बांगलादेश स्वातंत्र्यासाठी केलेलं आंदोलन आणि अटकेचा उल्लेख केला. “मी बांगलादेशातील बंधू, भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,” असं मोदी म्हणाले.

चतुर्वेदी यांचे प्रश्न

मोदींच्या या वक्तव्यासंदर्भात ट्विट करताना चतुर्वेदी यांनी इंदिरा गांधीचा थेट उल्लेख टाळला असला तरी १९७१ साली भारतीय पंतप्रधानांनी अनेक देशांच्या विरोधाचा सामना करत बांगलादेशला मदत केल्याचं म्हटलं आहे. “१९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेसारख्या देशाने केलेल्या विरोधाचा सामना करुनही बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं. मला प्रश्न पडला आहे की जर सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१ संदर्भात आपल्याला लवकरच नवीन माहिती मिळेल,” असं ट्विट चतुर्वेदी यांनी केलं आहे.

पुस्तकात आहे उल्लेख

मोदींच्या या वक्तव्यानंतर सोशल नेटवर्किंगवर चांगलेच आरोप प्रत्यारोप झाल्याचं चित्र पहायला मिळालं. अनेक विरोधकांनी मोदी या आंदोलनात कसे होते यासंदर्भात प्रश्न उपस्थित करणारे हजारोंच्या संख्येने ट्विट केले. मात्र मोदी आणि भाजपा समर्थकांकडून पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा दाखला पुरावा म्हणून दिला जात आहे. मोदींनी गुजरातमधील वेगवेगळ्या संघर्षामधील आपले अनुभव कथन करणाऱ्या पुस्तकात बांगलादेशच्या स्वांत्र्यासाठी केलेल्या सत्याग्रहाचा उल्लेख आहे. पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच, “आणीबाणीचे २० महिने, सरकारी कामकाजाचे अपयश सिद्ध करत भूमिगत चळवळीच्या माध्यमातून काम केलं आणि स्वत:मधील संघर्ष करण्याची वृत्ती कायम ठेवली. यापूर्वी आम्ही बंगलादेशच्या सत्याग्रहाच्या वेळी तिहार तुरुंगामध्ये जाऊन आलो,” असं लिहिण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे १२ ऑगस्ट १९७१ रोजी जनसंघाच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या बातमीची कात्रणंही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालीयत.