कुख्यात गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. मागच्या आठवडयातच त्याने आठ पोलिसांची हत्या केली, तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. आठवडयाभरापासून फरार असलेल्या विकास दुबेला काल मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात अटक करण्यात आली होती. त्याला उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आज कानपूरला घेऊन येत असताना ताफ्यातील एक वाहन पलटी झाले. त्यानंतर विकास दुबे पोलिसाचे शस्त्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल यूपी एसटीएफने केलेल्या कारवाईत विकास दुबे ठार झाला.

आणखी वाचा- अपघात, पळून जाण्याचा प्रयत्न आणि चकमक; अशा पद्दतीने विकास दुबे झाला ठार

विकास दुबेचा खात्मा झाल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया येत आहेत. राज्यसभेतील खासदार आणि शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी या एन्काऊंटरसंबंधी टि्वट केले आहे. ‘न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी’ असे चर्तेुवेदी यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- ३० वर्षात पाच हत्या, ६२ गुन्हे यूपीचा खतरनाक गँगस्टर विकास दुबे

आणखी वाचा- “कार उलटल्यामुळे सरकार पडण्यापासून वाचलं”; दुबे एन्काउंटर प्रकरणावर नेत्याचा योगींना टोला

या एन्काऊंटरसंबंधी पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.