News Flash

काँग्रेसचे प्रियंकास्त्र!

सरचिटणीसपदावरील नियुक्तीद्वारे सक्रिय राजकारणात प्रवेश

प्रियंका गांधी- (संग्रहित छायाचित्र)

सरचिटणीसपदावरील नियुक्तीद्वारे सक्रिय राजकारणात प्रवेश

नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची उत्सुकता अखेर बुधवारी संपुष्टात आली. काँग्रेसने प्रियंका यांची उत्तर प्रदेशच्या (पूर्व भाग) सरचिटणीसपदी नियुक्ती केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने हा बहुप्रतीक्षित ‘हुकमी एक्का’ बाहेर काढल्याचे मानले जाते.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी प्रियंका यांच्याकडे निम्मा उत्तर प्रदेश (८० पैकी ४० जागा) सोपवला. पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. काँग्रेसचे संघटनात्मक सरचिटणीस म्हणून अशोक गेहलोत यांनी अखेरचे परिपत्रक बुधवारी जारी केले. त्यात, तिसऱ्या परिच्छेदात प्रियंका गांधी-वढेरा यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाल्याने के. सी. वेणुगोपाल हे नवे संघटनात्मक सरचिटणीस असतील. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या नियुक्तीचा निर्णय राहुल यांनी सोनिया आणि प्रियंका यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला होता. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्याशी स्वतंत्रपणे झालेल्या चर्चेतही प्रियंका उपस्थित होत्या. त्यानंतर प्रियंका सक्रिय राजकारणात प्रवेश करतील, असे मानले जात होते. २००४ पासून प्रियंका अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील अनुक्रमे राहुल आणि सोनिया गांधी यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. आतापर्यंत उर्वरित उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी प्रचार करण्याचे प्रियंका यांनी टाळले होते. मात्र, भाजपचे पाठिराखे असलेल्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रियंका सरचिटणीस म्हणून निवडणूक प्रचार करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानलेला गोरखपूर पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येत असल्याने काँग्रेसने भाजपला मोठा राजकीय दणका दिला आहे. सध्या परदेशात असलेल्या प्रियंका १ फेब्रुवारी रोजी सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या निर्णयाद्वारे उत्तर प्रदेशमध्ये मरगळलेल्या काँग्रेसमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केला आहे.

२०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर ‘प्रियंका लाओ, काँग्रेस  बचाओ’ अशी घोषणाबाजी पक्ष कार्यकर्त्यांना केली होती. प्रियंका यांच्या पुढाकारामुळेच काँग्रेसने गेल्या वेळी विधानसभेसाठी समाजवादी पक्षाशी आघाडी केली होती. मात्र, दोन्ही पक्षांचा पराभव झाला. आता लोकसभा निवडणुकीसाठी सप-बसप यांच्या युतीत काँग्रेसला स्थान न मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली होती. प्रियंका यांच्याकडे सूत्रे आल्याने काँग्रेस पूर्व उत्तर प्रदेशात भाजपच नव्हे, तर सप-बसप आघाडीवरही मात करेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

भाजप, सप-बसपला धास्ती

पूर्व उत्तर प्रदेशमध्ये मोदी आणि योगी यांचेच मतदारसंघ येत नाहीत तर भाजप, सप आणि बसपच्या महत्त्वाच्या नेत्यांचेही मतदारसंघ येतात. रामजन्मभूमी अयोध्याही फैजाबाद मतदारसंघात आहे. सध्या सपाकडे असलेला गोरखपूर, आझमगढ, अखिलेश यादव यांचा मुबारकपूर, मायावतींनी प्रतिनिधित्व केलेला आंबेडकरनगर, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचा गाझीपूर तसेच, अलाहाबाद, देवरिया हे मतदारसंघही पूर्व उत्तर प्रदेशात येतात. या मतदारसंघात प्रियंका प्रचार करणार असल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या असून, भाजपसह सप, बसपची चिंता वाढली आहे.

घराणेशाही अधोरेखित : भाजप

* प्रियंका यांच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशामुळे भाजपने कॉंग्रेसच्या घराणेशाहीकडे बोट दाखविले आहे.

*राहुल गांधी पक्षाचे नेतृत्व करण्यात अपयशी ठरत असल्यामुळेच काँग्रेसला प्रियंका यांना पाचारण करावे लागले आहे.

* गांधी घराण्यापलीकडे काँग्रेसला कोणीही नेता शोधता येत नाही, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

मतदारसंघ कोणता?

प्रियंका निवडणुकीच्या रिंगणातही उतरतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहुल यांचा अमेठी व सोनिया यांचा रायबरेली यापैकी एका मतदारसंघातून प्रियंका लोकसभेची निवडणूक लढवू शकतील. सोनिया रायबरेलीतूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असतील तर, पूर्व उत्तर प्रदेशमधील फूलपूर हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भागातील एखाद्या मतदारसंघातून प्रियंका यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. हरयाणा आणि राजस्थानमधील जमीन खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुकवरून पत्नी प्रियंका यांचे अभिनंदन केले असून आपण सदैव पाठीशी राहू, असे म्हटले आहे.

‘काही लोकांसाठी कुटुंबच पक्ष’

नवी दिल्ली : काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे. आमच्यासाठी पक्ष हा परिवार आहे. महाराष्ट्रातील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद  साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले.  आमचा विरोध काँग्रेसच्या संस्कृतीला आहे. काँग्रेसमुक्त देश याचा अर्थ काँग्रेसमुक्त संस्कृती असल्याचे त्यांनी नमूद केले.

आम्ही बचावात्मक नव्हे तर आक्रमक राजकारणावर भर देणार आहोत. त्यासाठीच प्रियंकावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. माझी बहीण आता माझ्यासोबत काम करणार याचा मला आनंद आहे.  निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय प्रियंकाने घ्यायचा आहे. काँग्रेसची विचारधारा सशक्त करून उत्तर प्रदेशात पक्षाला बळकट करण्याची जबाबदारी प्रियंका व ज्योतिरादित्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे.  – राहुल गांधी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 3:57 am

Web Title: priyanka gandhi appointed congress general secretary for uttar pradesh
Next Stories
1 कुठलेही सरकार असले तरी भारताचा विकास जोमानेच
2 प्रियंकामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचे पुनरुज्जीवन?
3 अय्यपा दर्शनानंतर सासरी प्रवेश नाकारल्याने कनकदुर्गा निवारागृहात
Just Now!
X