लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसचा वनवास संपवण्यासाठी दणक्यात आगमन केले असून, त्यांच्यावर सध्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली असली तरी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करण्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी ही शक्यता वर्तवली आहे. २०१७ मधील उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी केवळ  सात जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या, त्यामुळे काँग्रेसची स्थिती दयनीय अशीच आहे. प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार जाहीर केल्यास काँग्रेसला राजकीय संजीवनी मिळू शकेल असे काँग्रेस नेत्यांना वाटते. १९८९ नंतर उत्तर प्रदेशातील सत्ता ही समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व भाजप यांच्यात फिरत राहिली आहे. देशातील राजकारणाचे कुरुक्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशवर सध्या काँग्रेसचा कुठलाही प्रभाव राहिलेला नाही. प्रियंका यांच्या राजकारण प्रवेशामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यांची वेगळी रणनीती पक्षाला तारण्याची शक्यता पक्षात वर्तवली जात आहे. लखनौमध्ये प्रियंका यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स लागली असून त्यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे.

प्रियंका गांधी या आतापर्यंत उत्तर प्रदेशातच सक्रिय राहिल्या आहेत. त्यातही अमेठी व रायबरेली या पारंपरिक मतदारसंघांबाहेर त्यांनी काम केलेले नाही. आता त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य केले असून, भाजपवर सतत हल्लाबोल करण्याची जबाबदारी त्यांना  देण्यात आली आहे. बनावट दारू प्रकरणात अनेक लोक मरण पावल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या प्रियंकांनी कार्यकर्त्यांना तीन दिवसांमध्ये दररोज १२ तास भेटण्याचा संकल्प केला आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांमध्ये प्रियंका आणि ज्योतिरादित्य सिंधिया आपला प्रभाव असलेल्या क्षेत्रांतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

सवर्णाचे मन वळवणार

पक्षापासून दूर गेलेल्या सवर्ण समाजाला पुन्हा पक्षाशी जोडण्याचे काम प्रियंकांना करावे लागणार आहे. आपल्या दौऱ्यात प्रियंका ब्राह्मण, राजपूत समाजांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत. यासाठी पक्षाने एक विशेष पथक केले असून, त्याला पक्षापासून दूर गेलेल्या ब्राह्मण आणि राजपूत समाजाला पुन्हा जोडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रियंकांना पहिल्या तासात ४५ हजार अनुसारक

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करताना सोमवारी ट्विटर खाते सुरू केले आहे. त्यांना पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला असून या समाजमाध्यमावर काही तासातच ४५ हजार अनुसारक मिळाले आहेत. अ‍ॅट प्रियंका गांधी असे त्यांचे खाते असून त्यांच्या उत्तर प्रदेश भेटीच्या निमित्ताने ते सुरू करण्यात आले. प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशातील जबाबदारी असून ४० हून अधिक लोकसभा मतदारसंघ त्यांच्या अखत्यारित येतात. प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर सुरुवातीला काहीच संदेश टाकलेला नाही. श्रीमती प्रियंका गांधी आता ट्विटर वर आहेत तुम्ही त्यांना अनुसरू शकता असे अ‍ॅट प्रियंका गांधी नावाने टाकलेल्या संदेशात म्हटले आहे. प्रियंका यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, अशोक गेहलोत, रणदीप सुरजेवाला, अहमद पटेल यांना अनुसरण्यास सुरुवात केली आहे. एकूण ४५ हजार लोकांनी प्रियंका गांधी यांना अनुसरले असून (फॉलो करणे) यात त्यांची लोकप्रियता दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रियंका गांधी (वय ४७) व ज्योतिरादित्य शिंदे (वय ४८) यांनी अ. भा. काँग्रेस सरचिटणीसपदाची सूत्रे गेल्या आठवडय़ात नवी दिल्ली येथे स्वीकारली होती. काँग्रेसने २०१४ च्या निवडणुकीतील पराभवातून धडा घेतला असून यावेळी समाजमाध्यमांवरही काँग्रेसचा प्रचार जोराने करण्याचे तंत्र अंगिकारले आहे. गेल्या वेळी भाजपने मिळवलेल्या विजयात समाजमाध्यमांचा मोठा वाटा होता. राहुल गांधी हे आधीच ट्विटरवर असून त्या माध्यमातून ते सरकारवर बोचरी टीका करीत आहेत. त्यातून त्यांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्नही चालवला आहे.