कुंभमेळ्यात गंगा स्नान केल्यानंतर प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशच्या महासचिवपदाचा कार्यभार स्वीकारतील असे वृत्त समोर येत असतानाच सनातन संस्थेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कुंभमेळ्यात स्नान करा किंवा मंदिरात जा, पण यामुळे हिंदू जनता मतांची भीक घालणार नाही, असे ‘सनातन’ने म्हटले आहे.

प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची उत्सुकता गेल्या आठवड्यात संपुष्टात आली होती. काँग्रेसने प्रियंका यांची उत्तर प्रदेशच्या (पूर्व भाग) सरचिटणीसपदी नियुक्ती केली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने हा बहुप्रतीक्षित ‘हुकमी एक्का’ बाहेर काढल्याचे मानले जाते. प्रियंका गांधी या फेब्रुवारीत पदभार स्वीकारतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले होते.

प्रयागराज येथे ‘कुंभ २०१९’ सुरू असून यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक आणि संत उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. ४ फेब्रुवारी कुंभमेळ्यात गंगास्नान केल्यानंतर प्रियंका गांधी या पदभार स्वीकारतील, अशी चर्चा देखील आहे. गंगास्नान केल्यानंतर वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी त्या पदभार स्वीकारतील, असे देखील सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी २००१ मध्ये सोनिया गांधी यांनी देखील कुंभमेळ्यात गंगास्नान केले होते.  ४ फेब्रुवारीला अमावस्येच्या दिवशी तिसरे शाही स्नान होणार आहे.

काँग्रेसने हिंदू मतदारांना पक्षाकडे खेचण्यासाठी मवाळ हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीपासून मंदिर भेटींना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.  या पार्श्वभूमीवर ‘सनातन’ संस्थेने ‘सनातन प्रभात’ या वेबसाईटवर एक व्यंगचित्र अपलोड केले आहे. यात प्रियंका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि सोनिया गांधी यांना दाखवण्यात आले आहे.’कुंभमेळ्यात स्नान करा, अथवा मंदिरा जा, हिंदू मतांची भीक घालणार नाही’, असे या व्यंगचित्रात म्हटले आहे. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे घोटाळेबाज असून ही घराणेशाही संपवा, असे आवाहनही या व्यंगचित्रातून करण्यात आले आहे.