काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून हिंसाचारात दहा जण ठार झाल्याच्या प्रकरणी मृत व जखमींच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना काल  मिर्झापूर प्रशासनाने रोखून ठेवले. त्यानंतर शनिवारी संबंधित कुटुंबीय अतिथिगृहावर त्यांना भेटायला गेले असता त्यांना पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले होते.

ते लोक लांबून भेटण्यासाठी आले आहेत, निदान अतिथिगृहात तरी त्यांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशा संतप्त भावना प्रियंका यांनी व्यक्त केली.  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना भेटण्यासाठी सोनभद्र येथील १५ कुटुंबीय चुनर येथील अतिथिगृहात आले  होते पण त्यांना रोखण्यात आले. पण नंतर त्यांच्यापैकी बारा जणांना प्रियंका यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. प्रियंका यांनी शुक्रवारची रात्र अतिथिगृहातच काढली.

गांधी यांनी वार्ताहरांना सांगितले, की पीडित कुटुंबीयांपैकी १५ जण भेटण्यासाठी आले होते पण ते दु:खात असूनही त्यांना रोखण्यात आले, त्यांच्या गावात हत्याकांड झाले असून मोठया कठीण प्रसंगास ते तोंड देत आहेत. खून झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना भेटण्यास परवानगी देण्यात आली नाही हे योग्य नाही.

प्रियंका गांधी यांनी भेटण्यासाठी आलेल्या लोकांना रडू कोसळल्यावर त्यांचे अश्रू पुसले व त्यांना पाणी दिले. पक्षाचे नेते अजय राय यांनी सांगितले,की पीडित कुटुंबातील १२ जण प्रियंका गांधी यांना अतिथिगृहात भेटले.

उब्बाह खेडय़ात यज्ञ दत्त व गोंड आदिवासी यांच्यात घोरावल येथील जमिनीच्या तुकडय़ावरून बुधवारी संघर्ष झाला, त्या वेळी दत्त यांच्या समर्थकांनी केलेल्या गोळीबारात दहा ठार तर २८ जण जखमी झाले होते.

तृणमूलच्या शिष्टमंडळासही अटकाव

उत्तर प्रदेशात सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबारात १० जण ठार झाल्याच्या प्रकरणात पीडित कुटुंबाना भेटण्यासाठी जात असताना शनिवारी  तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळास रोखण्यात आले आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना आम्हाला  वाराणसी विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले, असे पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळात ओब्रायन यांच्यासह सुनील मोंडाल व खासदार अबीर रंजन बिस्वास यांचा समावेश होता. सोनभद्र हिंसाचारातील जखमी व मृतांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या सोनभद्रकडे जात असताना त्यांना मिर्झापूर जिल्ह्य़ातच अडवण्यात आले होते. त्यानंतर आता तृणमूलच्या शिष्टमंडळालाही रोखण्यात आले आहे.

तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी म्हटले आहे,की तृणमूलचे संसदीय शिष्टमंडळ सोनभद्रकडे जाण्यासाठी वाराणसी विमानतळावर आले असता पोलिसांनी स्थानबद्ध केले. मृत व जखमींच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी  सोनभद्र येथे जाऊ देण्याची विनंती केली तरी अधिकाऱ्यांनी रोखून ठेवले. आम्ही संख्येने कमी असल्याने कलम १४४ चे उल्लंघन झालेले नाही, असे असतानाही त्यांनी आम्हाला स्थानबद्ध केले. कुठल्या कलमाखाली ही कारवाई करण्यात आली हे अजून सांगण्यात आलेले नाही.

तृणमूलचे शिष्टमंडळ सोनभद्र येथील पीडित  कुटुंबीयांना भेटून सायंकाळीच विमानाने परत जाणार होते. शनिवारी पक्षाचे शिष्टमंडळ सोनभद्रला जाईल, असे तृणमूल काँग्रेसने शुक्रवारीच जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीपासून तृणमूल व भाजप एकमेकांवर कुरघोडी करीत असून पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठय़ा प्रमाणात यश मिळवले आहे.