लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी अखेरीस केंद्र सरकारने परवानगी दिली. या मजुरांसाठी रेल्वे विभागाने विशेष श्रमिक गाड्यांचीही सोय केली. महाराष्ट्रातून आतापर्यंत २ लाख परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेले आहेत. मात्र रोजगार तुटल्यामुळे अनेक मजूर आजही जिवाचा धोका पत्करत चालत किंवा मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे प्रवास करत आहेत. रस्त्याने चालत घरी जात असताना झालेल्या अपघातांमध्ये काही दिवसांपूर्वी मजूरांना आपले प्राण गमवावे लागले होते. अखेरीस प्रियंका गांधी या मजुरांसाठी धावून आल्या आहेत.

प्रियंका गांधी यांनी मजूरांना आपल्या घरी आणण्यासाठी १ हजार बस गाड्यांची सोय करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठीचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल फक्त यासाठी उत्तर प्रदेश सरकारने परवानगी द्यावी म्हणून प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहीलं आहे. गाझिपूर आणि नोएडा परिसरातून दररोज ५०० बस चालवण्याची तयारी काँग्रेस पक्षाने घेतल्याचं प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं. राष्ट्राच्या उभारणीसाठी महत्वाचं योगदान बजावलेल्या मजुरांना आपण अशा खडतर काळात एकटं सोडू शकत नाही असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.

ज्या कामगारांना रेल्वेचा प्रवास शक्य नाहीये ते कामगार आजही रस्त्याने आपल्या गावाकडे चालत जाण्याचा पर्याय स्विकारला आहे. आतापर्यंत ६५ कामगारांना या काळात अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.