काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी आणि पक्षाच्या सरचिटणीस व पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या आपल्या विदेश दौऱ्यावरुन परतल्या आहेत. अमेरिकेहून परतल्यावर प्रियंका या राहुल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली.

काँग्रेस सरचिटणीसपदी प्रियंका यांच्या नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मुलीच्या उपचारासाठी अमेरिकेला गेलेल्या प्रियंका गांधी यांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी पक्षाच्या सरचिटणीसांसह राज्यांमधील प्रभारींची ७ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित केली आहे. सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी या बैठकीत सहभागी होतील. सरचिटणीसांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर ९ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली आहे. यात प्रदेश काँग्रेसच्या तयारीबाबत चर्चा होईल.

यापूर्वी राहुल गांधी हे बहीण प्रियंका यांच्यासह प्रयागराज येथे सुरू असलेल्या अर्धकुंभ मेळ्यात सहभागी होणार असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील कुंभ क्षेत्रात प्रियंका यांना गंगाची मुलगी म्हणणारे पोस्टर्स लावण्यात आले होते.