उन्नावप्रकरणी प्रियंका गांधी यांची टीका

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेला आदेश हा उत्तर प्रदेशात ‘जंगल राज‘ सुरू असून ते रोखण्यात तेथील सरकार अपयशी ठरल्यावर करण्यात आलेले शिक्कामोर्तब आहे,अशी टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.

उन्नाव प्रकरणी तातडीची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते, की या प्रकरणातील सर्व पाच खटले उत्तर प्रदेशातून दिल्लीतील न्यायालयात वर्ग करण्यात यावेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय उत्तर प्रदेशातील  ‘जंगल राज’वर शिक्कामोर्तब करणारा आहे. भाजपने अखेर गुन्हेगाराला संरक्षण दिल्याचे मान्य करून त्यांच्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली, हे एक पाऊ ल चूक सुधारण्यासाठी त्यांनी टाकले आहे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

भाजपने आमदार कुलदीप सेनगर याला पक्षातून काढून टाकले आहे. सेनगर हा चार वेळा आमदार झालेला असून त्याला गेल्यावर्षी तेरा एप्रिलला २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर त्याच्या निवासस्थानी बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या रविवारी पीडित मुलगी, तिचे नातेवाईक ,  वकिलांसमवेत काकांना  भेटण्यासाठी रायबरेलीला जात असताना तिच्या मोटारीला ट्रकने धडक दिली होती. त्यात तिची काकू व आत्या ठार झाले असून ती व वकील गंभीर जखमी  झाले आहेत.

प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की उन्नावच्या कन्येला आता बराच संघर्ष केल्यानंतर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तिने अनेक अडथळे, अन्याय व वेदनांना तोंड दिले आहे. उन्नावच्या कन्येसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांंनी व लोकांनी जो लढा दिला त्याबाबत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.