उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला चढविला. आदित्यनाथ यांनी गुन्ह्य़ांच्या आकडेवारीवर पांघरूण घालण्याशिवाय अन्य काय केले, असा सवाल गांधी-वढेरा यांनी केला आहे.

गांधी-वढेरा यांनी उत्तर प्रदेशातील काही गुन्ह्य़ांची आलेखाच्या स्वरूपात आकडेवारी ट्वीट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. देशातील हत्येच्या गुन्ह्य़ांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेश अग्रस्थानी असल्याचे आढळेल, राज्यात दररोज सरासरी १२ हत्या होतात, असे गांधी-वढेरा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात २०१६ ते २०१८ या कालावधीत मुलांविरुद्धच्या गुन्ह्य़ांमध्ये २४ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीवर पांघरूण घालण्याशिवाय मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाने दुसरे काय केले, असा सवालही त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील गुन्हेगार मोकाट फिरत असून त्यांना सत्तेवर असलेल्यांकडून संरक्षण मिळत आहे आणि आपले जवान आणि अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.