काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी-वढेरा यांना डेंग्यूचे निदान झाले असून त्यांच्यावर दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालय प्रशासनाने याबाबत माहिती दिली.


डेंग्यूचे निदान झाल्यानंतर प्रियांका यांना २३ ऑगस्ट रोजी पुढील उपचारांसाठी सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर अरुप बसू हे उपचार करीत आहेत. प्रियांका यांना सुरुवातील ताप आला होता. त्यानंतर काही चाचण्या केल्यानंतर त्यांना डेंग्यूचे निदान झाले. त्यानंतर त्यांना २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाचे अध्यक्ष डी. एस. राणा यांनी याबाबत माहिती दिली. प्रियांका यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही राणा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये ६५७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ३२५ रुग्ण हे दिल्लीस्थित आहेत तर ३३२ रुग्ण हे दिल्ली बाहेरील राज्यातील आहेत. या सर्व रुग्णांवर दिल्ली रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  या डेंग्यूंच्या रुग्णांपैकी दक्षिण दिल्ली महापालिका क्षेत्रात ६४ रुग्ण तर ४२ रुग्ण हे नवी दिल्ली महापालिकेच्या क्षेत्रात आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे डेंग्यू व मलेरियाच्या डासांचा झपाटय़ाने प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याबाबतची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सादर केली होती.

यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत ४९ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. या दिवसात ८३९ संशयित डेंग्यूच्या रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. गेल्या महिन्यात ७० डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. मात्र, ऑगस्टच्या १५ दिवसांतच ४९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.