काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं यासंदर्भात तसं पत्र प्रियंका गांधी यांना दिलं आहे. सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी त्यांना एका महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे १ ऑगस्टपर्यंत त्यांना हा सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमध्ये शासकीय बंगला देण्यात आलेला होता. मात्र, आता बंगला रिकामा करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयानं यासंदर्भात प्रियंका गांधी यांना पत्र पाठवले आहे.

कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना शासकीय बंगला?

प्रियंका गांधी या २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय राजकारणात उतरल्या. त्यापूर्वी त्या फारशा राजकारणात नव्हत्या. मात्र, असं असलं तरी त्या कोणत्याही संवैधानिक पदावर नाहीत. त्यामुळे त्यांना शासकीय बंगला कशामुळे देण्यात आला होता? असा प्रश्न अनेकांना पडला. प्रियंका गांधी संवैधानिक पदावर नसल्या, तरी त्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आलेली होती. ही सुरक्षा काही महिन्यांपूर्वी हटवण्यात आली. एसपीजी सुरक्षा असणाऱ्या व्यक्तींना शासकीय निवासस्थान दिले जाते. मात्र, सुरक्षा हटवल्यानं आता शासकीय बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.