काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी लखनौमधून आपल्या राजकीय कारकीर्दीस औपचारिक सुरूवात केली आहे. तत्पूर्वी त्यांनी ट्विटवरही ‘एंट्री’ केली आहे. ‘श्रीमती प्रियंका गांधी वढेरा आता ट्विटवर आहेत. तुम्ही त्यांना @priyankagandhi वर फॉलो करू शकता,’ असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विटर अकाऊंट सुरू केले असले तरी त्यांनी अद्याप एकही ट्विट केलेले नाही. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढताना दिसते. त्यांनी सर्वांत प्रथम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना फॉलो केले आहे. त्यानंतर त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे, रणदीपसिंह सुरजेवाला, अहमद पटेल, काँग्रेस, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना फॉलो केले आहे.

राज्यातील लोकसंबरोबर एकत्र येऊन नवे राजकारण सुरू होण्याची आशा आहे. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असेल, असे उत्तर प्रदेशच्या आपल्या पहिल्या दौऱ्याच्या एक दिवस आधी प्रियंका गांधी यांनी म्हटले.

प्रियंका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेश तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे दोन्ही सरचिटणीस १२, १३ आणि १४ फेब्रुवारीला लखनौ येथे प्रदेश काँग्रेस कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. प्रियंका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशमधील ४२ आणि पश्चिम उत्तर पद्रेशमधील ३८ जागांची जागांची जबाबदारी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.