प्रियंका गांधी वढेरा यांनी मागील आठवड्यात काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर ते आज (सोमवार) उत्तर प्रदेशचा पहिला दौरा करत आहेत. त्यांच्याबरोबर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेही आहेत. राहुल गांधी यांनी प्रियंका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. राहुल आणि प्रियंका यांच्याबरोबर ज्योतिरादित्य शिंदे हेही उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

राहुल गांधी, प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दुसरीकडे प्रियंका यांच्यात त्यांच्या आजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी पाहणाऱ्या नेते-कार्यकर्त्यांनी ‘प्रियंका सेना’ तयार केली आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी यांच्या ‘वानर सेने’च्या धर्तीवर ‘प्रियंका सेना’ तयार केली आहे. या सेनेचे सदस्य गुलाबी कपड्यांमध्ये दिसून येत आहेत.

आसामच्या सिलचरच्या काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘प्रियंका सेना’ची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रात त्या स्वत:ही दिसतात. उल्लेखनीय म्हणजे इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीवेळी युवकांची वानर सेना बनवली होती. यामध्ये मुलं आणि मुली दोघांचा समावेश होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे खूप छोटे पण उल्लेखनीय असे योगदान होते. ते मुख्यत: विरोध करणे, आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणे तसेच मोर्चे काढण्याचे काम करत.

सुष्मिता देव यांनी आपल्या ट्विटर हँडल लखनौ येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालय आणि विमानतळावरील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यात काँग्रेस भवन सजवल्याचे दिसत आहे.