पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमधील कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे. एका हिंदी वृत्तावर प्रतिक्रिया देताना प्रियंका यांनी ट्विटवरुन पंतप्रधान मोदींबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

“उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लहान आणि लघू उद्योगांमध्ये लाखो रोजगार उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र खरं काय आहे ते पाहा. पंतप्रधान ज्या मतदारसंघामधून खासदार झाले आहेत तेथील शान असणाऱ्या विणाकाम कामगारांची अवस्था पाहा. या कामगारांना आज दागिणे विकून घर गहाण ठेऊन जगावं लागत आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये या कारागिरांकडे कामच नाहीय. छोटे व्यवसायिक आणि कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. वादळी प्रचार नाही तर आर्थिक मदत देणारे एखादे पॅकेजच त्यांना या संकटातून वर काढू शकतं,” असं प्रियांका यांनी ट्विटवरुन म्हटलं आहे.

प्रियंका यांनी ज्या बातमीवरुन मोदींवर निशाणा साधला आहे त्या वृत्तानुसार मागील काही महिन्यांपासून वाराणसीमधून अनेक विणाकाम करणारे उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे या विणकाम करणाऱ्या कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. हे कामगार एकमेकांची मदत करुन सध्या एक एक दिवस ढकलत आहेत. तसेच सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत कामगारांनी १ जुलै ते ७ जुलैदरम्यान सांकेतिक आंदोलनाची हाक दिली आहे.

गिरण्या बंद असल्याने अनेक विणकाम करण्याचे कौशल्य असणाऱ्या कामगारांना भाजी विकून, रिक्षा चालवून दिवस ढकलावे लागत आहेत. दिवसाला २०० ते ३०० रुपये कमाई करुन आलेल्या पैशांमध्ये दिवस काढायचा असं करत आम्ही जगत असून आमच्याकडे शिल्लक पैसे राहत नाहीत असं या कामगारांचं म्हणणं आहे.

वीज बिलाला विरोध

योगी सरकारने या विणकाम उद्योगांना सरसकट एका दराने देण्यात येणाऱ्या बीलांच्या योजनेमध्ये बदल करुन मीटर रिडींगवर आधारित पद्धत जानेवारीपासून सुरु केली आहे. त्यामुळे आता एका ठराविक मर्यादेनंतर मीटरनुसार या उद्योजकांना बील पाठवलं जातं आहे. १५० रुपये बील आता थेट अडीच हजारांपर्यंत येऊ लागल्याने आम्हाला आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. एवढी बिलं वाढवली तर आम्ही कामगारांना किती आणि कसे पैसे द्यायचे असा सवाल विणकाम गिरण्यांचे मालक विचारत आहेत.