30 September 2020

News Flash

प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा काँग्रेसला काय होणार लाभ

पूर्व उत्तर प्रदेशातील ४० लोकसभा मतदारसंघांसाठी प्रियंका यांची नेमणूक. या मतदारसंघांत मोदी यांचा वाराणसी व योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघही येतो.

प्रियंका गांधी (संग्रहित छायाचित्र)

प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची उत्सुकता अखेर बुधवारी संपुष्टात आली. काँग्रेसने प्रियंका यांची उत्तर प्रदेशच्या (पूर्व भाग) सरचिटणीसपदी नियुक्ती केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने हा बहुप्रतीक्षित ‘हुकमी एक्का’ बाहेर काढल्याचे मानले जाते.

प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा काँग्रेसला काय लाभ होणार यावर एक नजर टाकूयात..
१. प्रियंका गांधी यांच्या काँग्रेस प्रवेशाने सर्वच उत्तर प्रदेशातील राजकारणाची दिशा बदलणार असून, लोकसभा निवडणुकीत हा निर्णय चित्र पालटणारा ठरणार आहे. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांनी काँग्रेसला आघाडीत घेण्यास नाकारले होते, त्यामुळे काँग्रेसच्या जागा कमी होण्याची शक्यताही होती.

२. प्रियंका गांधी यांचा अमेठी व रायबरेली मतदारसंघात मोठा प्रभाव असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली होती. यापूर्वीही अनेकदा प्रियंका सक्रिय राजकारणात उतरण्याच्या चर्चा होत्या.

३. प्रियंका गांधी पुढील महिन्यात पदाची सूत्रे घेणार असून, त्यापूर्वी त्या उत्तर प्रदेशातील नेत्यांशी दिल्लीत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यात सप-बसपा युतीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार केला जाईल.

४. काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेनुसार पूर्व उत्तर प्रदेशातील ४० लोकसभा मतदारसंघांसाठी प्रियंका यांची करण्यात आलेली नेमणूक लाभदायी ठरणार आहे. कारण त्यांच्याकडे करिष्मा आहे. या ४० मतदारसंघांत पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघही येतो.

५. पूर्व उत्तर प्रदेशातील सध्याचे अनेक केंद्रीयमंत्री निवडून आलेले आहेत, त्यांची घोडदौड रोखण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल यांचा अमेठी व सोनियांचा रायबरेली मतदारसंघही यात येतो.

६. रायबरेलीतून सोनिया गांधी यांच्याऐवजी प्रियंका गांधी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

७. पूर्व उत्तर प्रदेशातील फुलपूरमधून यापूर्वी जवाहरलाल नेहरू व विजयालक्ष्मी पंडित हे निवडून आले होते. काँग्रेसला १९८४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ही जागा जिंकता आलेली नाही. २०१८च्या पोटनिवडणुकीत ही जागा समाजवादी पक्षाने बसपाच्या पाठिंब्यावर जिंकली होती.

८. प्रियंका गांधी या पहिल्यांदाच संघटनात्मक पद घेत आहेत. त्यांनी याआधी अनेकदा उत्तर प्रदेशला भेट दिली होती, पण ती रायबरेली व अमेठीपुरती मर्यादित होती. तेथे लोक त्यांना गांधी कुटुंबाची कन्या म्हणून ओळखतात.

९. नेहरू-गांधी घराण्यासाठी लोकांच्या मनात जी सदिच्छा आहे त्याचा चांगला फायदा प्रियंका उठवू शकतात असे काँग्रेसला वाटते. प्रियंका या अमेठी व रायबरेली शिवाय इतरत्रही प्रभावी प्रचारक म्हणून प्रचार सभा घेणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या दोन मतदारसंघांत प्रचार केला होता. नंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकांतही त्यांचा प्रचार मर्यादित भागात होता. त्या वेळी सप व काँग्रेस यांची युती करण्यात प्रियंका यांचा मोठा वाटा होता.

१०. प्रियंका आता चाळीस मतदारसंघांत प्रचार करतील व उत्तर प्रदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे हाच संदेश काँग्रेसने यातून दिला आहेत. त्यांच्या प्रचारामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना इतरत्र प्रचार करण्यास वेळ मिळणार आहे. ते केवळ उत्तर प्रदेशात अडकून पडणार नाहीत.

११. प्रियंका गांधी या त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारख्याच दिसतात व गर्दी खेचणाऱ्या प्रचारक म्हणून त्या काम करतील. काँग्रेसच्या जुन्या भावनिक आवाहनाला यात महत्त्व दिले असून हे काम प्रियंकाच चांगले करू शकतात.

१२. भाजपा विरोधी सप, बसपा यांनी काँग्रेसला वाळीत टाकले असताना प्रियंका या काँग्रेसला संजीवनी देऊ शकतात. त्यातून देशपातळीवरही काँग्रेसच्या जागा वाढू शकतात.

१३. भाजपाचा मतदार असलेल्या उच्च जातीच्या लोकांना त्या किती प्रमाणात काँग्रेसकडे वळवणार व सप-बसपा युतीचा सामना करताना त्या काँग्रेसच्या जागा वाढवणार का, या दोन मुद्द्यांवर त्यांचे यशापयश ठरणार आहे. गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपाची मते खाल्ल्याने सप-बसपाचा उमेदवार विजयी झाला होता, त्यामुळे मतदारांचा प्रतिसादही यात महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 12:23 pm

Web Title: priyanka gandhis entry into politics what will be the benefit to the congress
Next Stories
1 शेतकऱ्याची अवहेलना! कर्ज २४ हजार, माफ झालं फक्त १३ रूपये
2 ‘१० टक्के आरक्षण देणे भाजपाला पडणार महागात, फसवणूक झाल्याची दलितांची भावना’
3 देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही : मुख्य निवडणूक आयुक्त
Just Now!
X