काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पद स्वीकारल्यानंतरच्या पहिल्यांदाच मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर येथे जाहीर सभा घेतली. पहिलीच जाहीर सभा असल्याने सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे होतं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. महत्त्वाचं म्हणजे प्रियंका गांधी यांनी जाहीर सभेसोबत ट्विटरवरही आगमन केलं आहे. मंगळवारी त्यांनी पहिलं ट्विट केलं.

प्रियंका गांधी यांनी फेब्रुवारी 2019 मध्येच ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. मात्र मंगळवारी त्यांनी पहिलं ट्विट केलं. पाच मिनिटांच्या अंतरावर प्रियंका गांधी यांनी दोन ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटो टाकला आहे. साबरमतीच्या साध्या प्रतिष्ठेत सत्यतेचं वास्तव्य आहे असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा संदेश दिला आहे.

काँग्रेसने मंगळवारी गुजरातच्या अहमदाबादमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘गेल्या लोकसभा निवडणुकीत काहींनी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्यापासून ते महिला सुरक्षेपर्यंत अनेक आश्वासने दिली. पण, त्या आश्वासनांचे काय झाले’, असा सवाल करतानाच देशात द्वेष पसरवला जात आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.

‘देशातील घडामोडींमुळे मी दुखी आहे. देशातील संस्था उद्धस्त करण्यात येत आहेत. सर्वत्र द्वेष पसरवला जात आहे. द्वेषाचे रुपांतर प्रेमात करण्याची या देशाची संस्कृती आहे. देश वाचविण्यास आपले प्राधान्य असायला हवे. त्यामुळे अधिक सजग राहून कार्यरत राहणे ही देशभक्तीच ठरेल’, असंही प्रियंका गांधींनी यावेळी म्हटलं.

‘क्षुल्लक मुद्यांना बळी पडू नका. मोठमोठी आश्वासने देणाऱ्यांना प्रश्न विचारा आणि शहाणपणाने निर्णय घ्या’, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. ‘तुमचे मत हे एक शस्त्र आहे. त्या शस्त्राने तुम्ही कोणाला हानी पोहोचविणे अपेक्षित नाही. मात्र, तुम्हाला अधिक प्रबळ करणारे हे शस्त्र असून, त्याचा योग्य वापर करा. येत्या निवडणुकीत तुम्ही तुमचे भविष्य निवडा’, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.