प्रियांका गांधींची नियुक्ती काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी झाल्याचं वृत्त त्यांच्या कार्यालयानं फेटाळलं आहे. तसंच आगामी काळात त्या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात या चर्चेलाही काही अर्थ नाही असंही त्यांच्या कार्यलयातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. काँग्रेस पक्षातील जबाबदारीचं पद प्रियांका गांधी यांना देण्यात आल्याच्या काही बातम्या आल्या होत्या, मात्र त्यांना कोणतंही महत्त्वाचं पद देण्यात आलेलं नाही आणि यावर काहीही चर्चा झालेली नाही अशी माहिती प्रियांका गांधी यांचे स्वीय सचिव पी. सहाय यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली आहे.

प्रियांका गांधी यांना काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केल्याच्या बातम्या या पूर्णपणे निराधार आहेत, त्यांच्या पदाबाबत काँग्रेसच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही असंही सहाय यांनी म्हटलं आहे. ८ ऑगस्टला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली, या बैठकीला प्रियांका गांधी हजर राहिल्या होत्या. त्यानंतरच प्रियांका गांधी यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या बातम्या त्यांच्या कार्यालयानं फेटाळल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हजेरी होती. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी प्रियांका गांधींना कार्यकारी अध्यक्ष करावं अशी सूचना दिली होती. असं झाल्यास देशपातळीवर काँग्रेसला नवं बळ मिळू शकतं असंही सिंह यांनी म्हटलं होतं. मात्र आता प्रियांका गांधी यांच्या कार्यालयानंच हे वृत्त फेटाळलं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षात बदल करण्याचे संकेत दिले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली २०१४ च्या निवडणुका लढण्यात आल्या, मात्र त्यावेळी अपेक्षित यश मिळालं नाही. ते मिळावं म्हणून सोनिया गांधी काही महत्त्वाचे बदल करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांचं नाव चर्चेत यापुढेही येऊ शकतं. मात्र तूर्तास तरी प्रियांका गांधी यांना कोणतंही पद मिळाल्याचं वृत्त त्यांच्या कार्यालयानं फेटाळलं आहे.