भाजपची अवस्था गोंधळलेल्या उंदरासारखी झाली असल्याची प्रियांका गांधी यांनी केलेली टीका त्या पक्षाला चांगलीच झोंबली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी सोमवारी तातडीने प्रियांका गांधींच्या टीकेला उत्तर दिले आहे. प्रियांका गांधींनी राजकीय टीकेची पातळी ओलांडली असून, वढेरा कुटूंबाला देशातील कायद्याचा धाक वाटायला हवा, असे अरूण जेटली यांनी म्हंटले आहे. आपल्या ब्लॉगवरून जेटली यांनी प्रियांका गांधींच्या टीकेला उत्तर दिले आहे.
भाजपची सध्याची अवस्था म्हणजे चिकटल्यामुळे गोंधळलेल्या उंदरासारखी झाली असल्याची टीका प्रियांका गांधी यांनी रविवारी केली होती. त्याला जेटली यांनी उत्तर दिले. ते म्हणतात, प्रियांका गांधी यांनी आपल्या वक्तव्यातून राजकीय टीकेची पातळी ओलांडली आहे. माझ्या कुटुंबातील कोणीही विरोधकांचा उंदीर म्हणून उल्लेख करू लागले, तर मला त्याबद्दल नक्कीच चिंता वाटेल, असे जेटली यांनी ब्लॉगवर म्हटले आहे.
भाजपने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांकाचे पती रॉबर्ट वढेरा यांच्याविरोधात ८ मिनिटांची ध्वनिचित्रफीत आणि सहा पानी पुस्तिका प्रकाशित केली. त्यामुळे खवळलेल्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.