पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील जनता पेटून उठली आहे. सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटनेने जंदालीमध्ये रॅली काढली. यात सहभागी झालेल्या तरुणांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे, अशी मागणी केली. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. याआधीही अनेकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये रॅली काढून पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त केला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काढलेल्या रॅलीचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. पाकिस्तान सरकारकडून होणारे अत्याचार आणि गळचेपीविरोधात विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी हा मोर्चा काढला. यावेळी स्वातंत्र्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली. पाकिस्तान सरकार केवळ अन्यायच करत नाही तर गळचेपी करण्याचे कामही करत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तहेर संघटनांनी ‘मातृभूमी’ला दहशतवाद्यांचा अड्डा केला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. सैन्यबळाचा वापर करून येथील जनतेची गळचेपी करण्याचे काम पाकिस्तान सरकार करत आहे. आमचे हक्क द्यावेत आणि आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली.

पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पाकिस्तान सरकार गुलाम समजत आहे. अन्याय होत आहे. याविरोधात एकत्र येऊन तीव्र लढा उभारण्यात यावा, असे आवाहन संघटनेचे नेते लियाकत खान यांनी केले. पाकिस्तान सरकारकडून लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला जात आहे. त्यामुळे येथील जनतेमध्ये संताप आहे, असेही ते म्हणाले. येथे उद्योगधंदे नाहीत. पुरेशा नोकऱ्या नाहीत. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. येथील जनतेला कोणतेही अधिकार दिले जात नाहीत. आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकारही नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.