करोना प्रतिबंधक लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार असून राज्यांनी स्वतंत्रपणे लस खरेदी करू नये, अशी सूचना राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने सर्व राज्यांना केली आहे. त्यामुळे लशीची खरेदी आणि वितरण दोन्हीही केंद्रिभूत केले जाणार आहे.

करोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर देशभर वितरण करण्यासाठी मार्ग नकाशा तयार करण्याचे काम केंद्रीय स्तरावर सुरू झाले असून त्यासंदर्भात निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची पहिली बैठक बुधवारी घेण्यात आली. भारत हा जगातील प्रमुख लस उत्पादन केंद्रांपैकी असल्याने करोनाच्या लशीसाठी देशी उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करता येऊ शकेल तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरही लस उत्पादक देशांशी समन्वय कसा साधता येईल, या दोन प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या निवेदनात नमूद केले आहे.

केंद्र सरकारने राज्यांना वितरित केलेल्या कृत्रिम श्वसन यंत्रांच्या वापरासंदर्भातील अचूक माहिती उपलब्ध होणारी यंत्रणा विकसित केली गेली. त्याचप्रमाणे लशीच्या कुपीचे वितरण, साठवणी व लसीकरण याची माहितीदेखील तज्ज्ञ गटाला मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. रशियाने करोना प्रतिबंधक लससंशोधन यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड, अमेरिका व चीनमध्येही संशोधन प्रगतीपथावर आहे. देशाअंतर्गतही तीन कंपन्यांच्या लशींची मानवी चाचणी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर लशीची निवड कशी करायची या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय सल्लागार गटाच्या उपसमितीकडून सूचना मागवण्यात आल्या असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

करोनायोद्धय़ांना लसीकरणाचा प्राधान्याने लाभ देण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात घेतलेल्या बैठकीत केली होती. त्यादृष्टीने लसीकरणाचे प्राधान्यक्रम कसे ठरवायचे यावरही बैठकीत खल केला गेला. देशातील लसीकरणाच्या प्राधान्यक्रमांबरोबरच इतर देशांनाही करोना प्रतिबंधक लस पोहोचवण्यासाठी कोणती व्यवस्था करता येईल, याचाही विचार बैठकीत करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

रशियन लशीची सुरक्षितता सांगणे कठीण

हैदराबाद रशियाने कोविड १९ वर तयार केलेल्या लशीची परिणामकारकता आणि सुरक्षितता याबाबत माहितीअभावी आताच काही सांगता येणार नाही, असे सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे संचालक राकेश के. मिश्रा यांनी म्हटले आहे.

मिश्रा यांनी सांगितले की, रशियाने त्या लशीच्या योग्य चाचण्या घेतलेल्या नसल्याने त्या लशीची परिणामकारकता आणि सुरक्षितता सांगता येत नाही. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या न घेताच त्यांनी लस जारी केली. रशियाने चाचण्यांचे काही टप्पे गाळले आहेत.  तिसऱ्या टप्प्यात लशीची परिणामकारकता कळत असते. जर त्यांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या असतील तर त्यांनी त्याची माहिती सादर करावी, ही माहिती गोपनीय ठेवता येत नाही. रशियाची लस सुरक्षित नसेल तर कुठल्याही देशाने तिला परवानगी देऊ नये.

अमेरिकी आरोग्यमंत्रीही साशंक

करोनाची लस सर्वप्रथम तयार करण्यासाठी कुठलीही स्पर्धा लागलेली नाही. रशियाने जरी ‘स्पुटनिक व्ही’ ही लस तयार करून ती जारी केली असली तरी त्याबाबत साशंकता आहे, असे मत अमेरिकेचे आरोग्य मंत्री अ‍ॅलेक्स अझार यांनी व्यक्त केले आहे. सध्या ते तैवानच्या दौऱ्यावर असून त्यांनी सांगितले की, रशियाच्या लशीमागचे विज्ञान व सुरक्षितता याबाबत शंका आहे.