करोना परिस्थितीचा उच्चस्तरीय आढावा

भयावह वेगाने फैलावणाऱ्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्वसनयंत्रे, प्राणवायू आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. त्याचबरोबर खासगी आणि सरकारी औषधनिर्मिती क्षेत्रांनी पूर्ण क्षमतेने लसउत्पादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

करोनाशी लढण्यासाठी देशातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या तयारीचा पंतप्रधान मोदी यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबरच्या एका बैठकीत आढावा घेतला. औषधे, प्राणवायू, व्हेंटिलेटर्स आणि लसीकरण यांच्याशी संबंधित विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

रेमडेसिविरसह इतर औषधांच्या पुरवठ्याचा आढावा घेतानाच, प्राणवायू निर्मिती केंद्रे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे आवाहन यावेळी मोदी यांनी केले.

विविध औषधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशाच्या औषधनिर्मिती क्षेत्राची संपूर्ण क्षमता वापरण्याची गरज असल्याचे पंतप्रधान या बैठकीत म्हणाले. रेमडेसिविरसह इतर औषधांच्या वापरासाठी वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जायला हवे आणि त्यांचा काळाबाजार  रोखण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

चाचणी, रुग्णांचा शोध आणि उपचार या त्रिसूत्रीला पर्याय नाही. संकटकाळात स्थानिक प्रशासनांनी नागरिकांच्याप्रति संवेदनशीलता दाखवण्याची गरज आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान