सध्या देशात करोना प्रतिबंधक लशीच्या कमतरतेकडे वाटचाल चालू असतानाच येथील भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन लशीच्या वर्षाला सत्तर कोटी मात्रा निर्माण करण्याचे ठरवले आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे,की हैदराबाद व बेंगळुरू येथील दोन प्रकल्पात टप्प्याटप्प्याने लस निर्मिती क्षमता वाढवली जाईल. कंपनीची क्षमता वार्षिक २० कोटी लशींची असताना आता ती वाढवण्यात येत आहे. क्षमता वाढवण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. भारत बायोटेक कंपनी आता उत्पादन क्षमता अल्पावधीतच वाढवणार असून त्यासाठी बीएसएल ३ सुविधा उपलब्ध झाली आहे. भारतात प्रथमच अशा पद्धतीने सुविधा निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्याच्या तज्ज्ञतेच्या आधारावर  उत्पादन माहितीवर अतिशय शुद्ध स्वरूपातील निष्क्रिय विषाणू युक्त लशी तयार करता येणार आहेत. लशीची उत्पादनक्षमता वाढवण्याकरिता भागीदारीसाठी शोध चालू आहे. ज्यांना व्यावसायिक लस उत्पादनाचा अनुभव आहे त्यांचीच भागीदारी यात होऊ शकते. उत्पादन वाढवण्यासाठी यापूर्वी भारत बायोटेकने इंडियन इम्युनॉलॉजिकल्सशी करार केला आहे. यात औषधी द्रव्य तयार करण्यात सहकार्य घेतले जाणार आहे. तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रिया चालू असून इंडियन इम्युनॉलॉजिकल्स  या कंपनीकडे व्यावसायिक पातळीवरच्या लशी तयार करण्याची क्षमता व तज्ज्ञता आहे. भारत बायोटेकच्या लशीमध्ये अलगेल-आयएमडीजी हे औषधी द्रव्य वापरण्यात आले असून ते सुरक्षित आहे. त्यामुळे टी पेशींची स्मरणक्षमता वाढवली जाते. यात आयएमडीजी हा घटक स्वदेशी पातळीवर तयार केला  जात आहे व त्याचे उत्पादन देश पातळीवर होत आहे. भारतात लशीच्या औषधी द्रव्याच्या व्यावसायिकीकरणाचा हा पहिलाच प्रयत्न होता. अमेरिका, युरोपीय समुदायातील देश व मेक्सिको, फिलिपिन्स, इराण, पॅराग्वे, ग्वाटेमाला, निकाराग्वा, गयाना, व्हेनेझुएला, बोस्वाना, झिम्बाब्वे, या देशात कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी प्रयत्न चालू आहेत.