भारत बायोटेक कंपनीचा पुढाकार; तीस कोटी डोसचे जगभरात वितरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबाद येथील भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीने करोना संसर्गावर नाकावाटे देण्याची लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन (मॅडिसन), लस कंपनी फ्लुजेन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत असून त्यात भारत बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी ही लस तयार करण्याचे काम सुरू केले असून या लशीचे नाव ‘कोरो फ्लू’ असे ठेवण्यात आले आहे. भारत बायोटेक कंपनी लस तयार करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेणार आहे.

या लशीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत फ्लू जेन ही लस कंपनी त्यांची सध्याची उत्पादन प्रक्रिया भारत बायोटेकला देणार असून त्यामुळे लशीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे, असे मत भारत बायोटेकचे उद्योग विकास प्रमुख डॉ. राचेश एला यांनी व्यक्त केले आहे.

या लसीचा भविष्यातील वापर प्रभावीरित्या केला जाऊ शकतो, त्यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे या वेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

करोनाला रोखण्याचे तंत्र

करोनावर उपचार पद्धती विकसित करण्यासाठी जोरात काम सुरू असून सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू मानवी पेशीत ज्या दरवाजांनी प्रवेश करतो ते बंद करण्यासाठी एक अभिनव उपचार पद्धती विकसित केली जात आहे. ‘सेल’ या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार सार्स सीओव्ही २ विषाणूला पेशींमध्ये प्रवेश नाकारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचे जोस पेनिंगर यांनी म्हटले आहे की, यातील निकाल उत्साहवर्धक असून संबंधित औषध रक्तवाहिन्या व मूत्रपिंडावर कसा परिणाम करते याचीही माहिती उपलब्ध आहे. एसीई २ हे पेशींवरील प्रथिन सध्या या विषाणूच्या प्रवेशास कारण ठरत आहे. सार्स सीओव्ही २ या विषाणूवरील ग्लायकोप्रोटिनची ओळख  एसीई २ प्रथिनामुळे पटवली जाते व विषाणू पेशीत घुसून थैमान घालतो असे दिसून आले आहे. २००३ मध्ये सार्स सीओव्ही १ विषाणूतही ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटून तो विषाणू पेशीत घुसण्यात यशस्वी होत होता. कुठल्याही विषाणूरोधक औषधात नेमकी विषाणूची पेशीत घुसण्याची क्रिया रोखली जात असते. यात एपीएन ०१ या औषधाने हवा तो परिणाम साधला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Production of coro flu vaccine in india abn
First published on: 06-04-2020 at 00:17 IST