दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल आनंद महाविद्यालयाने सहायक प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची सेवा समाप्त केली आहे. सध्या ते नागपूर येथील तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्यांच्यावर माओवाद्यांशी संबंधाचा आरोप आहे.

साईबाबा यांच्या पत्नी वसंता यांना गुरुवारी महाविद्यालयाचे पत्र मिळाले असून त्यांची सेवा ३१ मार्चच्या दुपारपासून समाप्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य राकेश कुमार गुप्ता यांनी या पत्रात म्हटले आहे की, साईबाबा यांचे तीन महिन्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यांची सेवा समाप्त करण्यात आली असून आता यापुढे ते सेवेत नसतील. साईबाबा यांच्या सेवा समाप्तीबाबत प्राचार्य गुप्ता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

साईबाबा हे इंग्रजीचे सहायक प्राध्यापक होते व त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी २०१४ मध्ये माओवाद्यांशी असलेल्या संबंधावरून अटक केली होती. त्यांची पत्नी व मुली यांना ते अटकेत असतानाही त्यांच्या वेतनाचा निम्मा हिस्सा मिळत होता. साईबाबा यांच्या पत्नीने म्हटले आहे की, सेवा समाप्तीचा निर्णय हा सूडबुद्धीने घेतलेला असून कर्मचारी हक्कांचे हे उल्लंघन आहे. साईबाबा यांना दोषी ठरवल्याविरोधातील अपील अजून मुंबई न्यायालयात प्रलंबित आहे. ते असा निर्णय घेऊच कसा शकतात?

‘न्यायालयात आव्हान’

साईबाबा यांच्या पत्नी  श्रीमती वसंता यांनी म्हटले आहे की, साईबाबा यांच्या निलंबनापासून आम्ही निम्मे वेतन घेत आहोत. पण आता सेवा समाप्तीचा आदेश देण्यात आल्याने आमच्यापुढे आर्थिक विवंचना निर्माण होणार आहेत. आम्हाला आता वकिलांकडे जाण्यावाचून पर्याय नाही. आम्ही या निर्णयाला न्यायालयात आव्हान देऊ.