करोना संकटकाळात मोठ्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात सुरूच आहे. मंगळवारी आघाडीची प्रोफेशनल सोशल नेटवर्किंग वेबसाइट LinkedIn ने 900 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्याचा निर्णय घेतला.

जगभरातील अनेक कंपन्या LinkedIn चा वापर योग्य उमेदवाराचा शोध घेण्यासाठी करतात, तर उमेदवार/कर्मचारी या प्लॅटफॉर्मचा वापर नवीन नोकरी शोधण्यासाठी करत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये प्रोफेशनल सर्कलमध्ये LinkedIn विशेष लोकप्रिय ठरत आहे.

कंपनीने जगभरातील आपल्या 960 म्हणजे कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचं मंगळवारी जाहीर केलं. करोना व्हायरसमुळे रिक्रुटमेंटमध्ये प्रोडक्ट्सची मागणी घटल्याने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. सेल्स आणि हायरिंग ( sales and hiring ) डिव्हिजनधील कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LinkedIn ने आपल्या वेबसाइटवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. LinkedIn चे मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान रॉसलान्सकी (Ryan Roslansky) यांनी, नोकरीवरुन कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना 10 आठवड्यांचा पगार दिला जाईल, असं सांगितलं. याशिवाय, अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना 2020 अखेरपर्यंत आरोग्य विमाची सुविधा मिळेल असेही त्यांनी नमूद केले. नोकरीवरुन कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना या आठवड्यात याबाबत माहिती दिली जाणार आहे.