नवी दिल्ली : प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू आशिष दत्ता, प्रसिद्ध वैज्ञानिक आर. राजारामन यांच्यासह एकूण १२ मानद प्राध्यापकांकडे  जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रशासनाने शैक्षणिक अभिलेख म्हणजे करिक्युला व्हिटेची मागणी केल्याने नवा वाद सुरू झाला आहे.

मानद प्राध्यापक हे पद निवृत्त प्राध्यापकांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा या हेतूने दिले जात असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संशोधनही करू शकतात. रोमिला थापर यांच्यासारख्या इतिहासातील विदुषीकडे अशाप्रकारे शैक्षणिक अभिलेखाची मागणी विद्यापीठ प्रशासनाने केल्यामुळे त्याला आक्षेप घेण्यात आला आहे.  थापर यांच्यासह १२ जणांना यापुढेही मानद प्राध्यापक पदावर कायम ठेवायचे किंवा नाही याबाबत मूल्यमापन करण्यासाठी शैक्षणिक अभिलेखाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्राध्यापकांना पाठवलेली पत्रे मागे घेण्याची मागणी प्राध्यापक संघटनेने केली आहे

विद्यापीठाच्या कुलसचिवांनी म्हटले आहे की, केवळ थापर यांच्याकडेच नव्हे तर  एकूण १२ जणांकडेही शैक्षणिक अभिलेखाची मागणी करण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सांगितले की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कुणाही मानद प्राध्यापकाला काढून टाकण्याचा विचार नाही. केवळ प्रमाणित प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांच्याकडे शैक्षणिक अभिलेखाची मागणी करण्यात आली आहे.