गंगा नदी वाचवण्यासाठी मागच्या १११ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले कानपूर आयआयटीचे माजी प्राध्यापक जी.डी.अग्रवाल यांचे गुरुवारी निधन झाले. अग्रवाल यांनी गंगा नदीसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.

गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार पातळीवर कोणत्याही उपायोजना न झाल्याच्या निषेधार्थ अग्रवाल आमरण उपोषणाला बसले होते. ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येत ढासळल्यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले होते. अग्रवाल यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले असे एम्सकडून सांगण्यात आले.

आयुष्याच्या उत्तरार्धात अग्रवाल यांनी स्वामी ग्यान स्वरुप सानंद असे नाव धारण केले. २०१२ साली सुद्धा ते गंगा नदीसाठी उपोषणाला बसले होते. त्यावेळी जवळपास अडीच महिने जी.डी.अग्रवाल यांचे उपोषण चालले. अखेर तत्कालिन मनमोहन सिंग सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी सुद्धा त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून दिल्लीला आणण्यात आले होते.

आयआयटी कानपूरमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले. त्यांनी गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी गंगा प्रदूषण मुक्त करण्याचा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात विशेष प्रगती झालेली नाही. यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली होती.