वेदना असह्य़ झाल्या व आपण आप्तांसाठी ओझे आहोत असे वाटू लागले किंवा आपल्याकडून आता जगाला देण्यासारखे काही उरलेले नाही याची खात्री पटली, तर वैद्यकीय मदतीने आत्महत्येचा मार्ग पत्करण्याचा विचार करू, असे मत ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी तीन वर्षापूर्वी व्यक्त केले होते.

हॉकिंग यांनी हे मत व्यक्त केले तेव्हा ७३ वर्षांचे होते. वयाच्या २१व्या वर्षापासून हॉकिंग मोटर न्यूरॉन डिसीजने आजारी आहेत. हॉकिंग त्यावेळी म्हणाले होते की, एखाद्याला त्याच्या इच्छेविरोधात जिवंत ठेवणे हे योग्य नाही. २०१३ मध्ये त्यांनी असे म्हटले होते की, ज्यांचे जगणे अवघड झाले आहे त्यांना साहाय्यभूत आत्महत्येचा मार्ग खुला असला पाहिजे. त्याचा गैरवापर मात्र होता कामा नये.

वाचा : जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी आपल्याला एकटेपणाची भावना जाणवत असल्याची कबुली दिली होती. तुम्ही काय गमावलेत असे विचारले असता त्यांनी, ‘मी व्यवस्थित असतो तर पोहायला जाण्याची इच्छा होती’ असे बोलून दाखवले होते. जेव्हा माझी मुले तरूण होती तेव्हा त्यांच्याशी मला शारीरिक अर्थाने खेळता आले नाही, त्याची खंत वाटत असल्याचेही ते यावेळी म्हणाले होते.