जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे केंब्रिजमध्ये निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटनचे ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे जीवनचरित्र सर्वांनाच स्तिमित करणारे व प्रेरणादायी होते.

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात, अशा अनेक गूढ न उकललेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.

‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने त्यांना ग्रासले होते. गेली अनेक वर्ष त्या आजाराशी झगडत होते. त्यांची ही जिद्द आणि प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच होता. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी त्यांनी लिखाण केले. हॉकिंग यांना आधुनिक काळातील न्यूटन असे म्हटले जायचे. वयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात ल्यूकॅशियन प्रोफेसर झाले. केंब्रिज विद्यापीठात हे पद महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच मानले जाते. न्यूटन देखील ल्यूकॅशियन प्रोफेसरच होते.