भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात बरीच प्रगती झाली असून आपण दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना भेटणार आहोत असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पन्नास हजार अमेरिकी भारतीयांच्या ह्यूस्टन येथील मेळाव्यास उपस्थित राहणार असून २२ सप्टेंबरला हा मोठा कार्यक्रम होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना केव्हा व कुठे  भेटणार याचा उलगडा मात्र झालेला नाही. कारण त्यांनी त्याबाबत काही स्पष्टीकरण केलेले नाही.

मोदी व इम्रान खान यांना आपण भेटणार आहोत, असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

काश्मीर प्रश्न किंवा दोन देशात जम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढून घेतल्याने निर्माण झालेला तणाव यांचा उल्लेख न करता ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशात बरीच प्रगती झाली आहे, पण त्यांचा रोख दोन्ही देशातील तणावाच्या संबंधावरच होता.

पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी स्वीकारण्याची शक्यता फेटाळली होती. भारत व पाकिस्तान यांच्यातील सर्व प्रश्न हे द्विपक्षीय स्वरूपाचे असून ते द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातूनच सोडवावेत असे मत मोदी यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.

भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध भारताने ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढून घेतल्यानंतर तणावाचे बनले होते.

पाकिस्तानने भारताबरोबरचे राजनैतिक संबंध निम्न स्तरावर आणले होते. त्यात त्यांनी भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली होती. कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा ही भारताची अंतर्गत बाब आहे असे भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.  दरम्यान अध्यक्ष ट्रम्प हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अधिवेशनावेळी भेटण्याची शक्यता आहे.

ह्य़ूस्टन येथे मोदी यांच्या समवेत होणाऱ्या मेळाव्यानंतर ट्रम्प हे ओहिओला जाणार असून नंतर न्यूयॉर्कला परत येऊन संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा अधिवेशनात सहभागी होणार आहेत.  पंतप्रधान मोदी व पाकिस्तानचे समपदस्थ इम्रान खान हे २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा अधिवेशनात भाषण करणार आहेत.