करोना विषाणू वुहानमधील सरकारी प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आणि ती माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दडवून ठेवली, असा आरोप चीनच्या विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली मेंग यान यांनी पुन्हा एकदा केला आहे.

‘विऑन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, चीन सरकारला करोना विषाणूच्या प्रसाराची सगळी माहिती होती. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याकडे दुर्लक्ष केले.

वुहानमध्ये पहिला उद्रेक झाला तेव्हा तेथे चौकशी करणाऱ्यांत मेंग यांचा समावेश होता. त्यांनी सांगितले की, वुहानमध्ये करोना विषाणू प्रयोगशाळेत तयार केल्याचे प्रकरण दडपण्यात आले. चीन सरकारने हा विषाणू जाहीरपणे मान्य केला त्याआधीपासून त्याचा प्रसार त्यांना माहिती होता. वुहानमधील प्राण्यांच्या बाजारपेठेतून करोना पसरला ही चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने केलेली धूळफेक होती. प्रत्यक्षात चीन सरकारने समाजमाध्यमावर माझी प्रतिमा या आरोपांमुळे मलिन केली. चीनमधील माझ्या कुटुंबीयांना धमकावले, असे त्यांनी सांगितले.

मेंग या हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे विषाणुशास्त्र विभागात काम करीत असताना वरिष्ठांनी त्यांना शांत राहण्याचा

सल्ला दिला होता. बराच काळ त्या करोना विषाणूवर संशोधन करीत आहेत. ‘हा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत विकसित केलेला आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चीनने काही केले नाही. पण तो प्रयोगशाळेत तयार केलेला होता याचे पुरावे आपल्याकडे आहेत’, असेही त्यांनी सांगितले.

मेंग यांचा शोधनिबंध..

चीनवर केलेल्या आरोपानंतर मेंग यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले. चिनी अधिकाऱ्यांनी मारण्याची धमकी दिल्यानंतर आपण सुरक्षेसाठी अमेरिकेत आसरा घेतल्याचे त्यांनी सांगितले. करोना हा न्यूमोनियाचा प्रकार आहे असे सांगितले जात असतानाच मेंग यान या वुहानला गेल्या होत्या व तेथे मिळालेल्या माहितीनंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला सतर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मेंग यांनी याबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले असून ‘अनयुज्वल फीचर्स ऑफ सार्स सीओव्ही २ – जिनोम सजेस्टिंग सॉफिस्टिकेटेड लॅबोरेटरी मॉडिफिकेशन रॅदर दॅन नॅचरल इव्होल्युशन अ‍ॅण्ड डिलिनिएशन ऑफ इटस प्रॉबेबल सिंथेटिक रूट’ असे या शोधनिबंधाचे नाव आहे.